शिवजयंतीनिमीत्त मराठा सुकाणू समितीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष गणेश झगरे यांच्या अध्यक्षतेखाली व युवानेते उदयन गडाख यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संपादक करण नवले, आदर्श सरपंच योगेश म्हस्के, पत्रकार चंद्रकांत दरंदले, सतीश उदावंत, कादंबरीकार गणेश निकम, मंगलकारी पतसंस्थेचे चेअरमन दिपक शेळके, वन्यप्राणी संवर्धक विलास म्हस्के यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषीराज टकले, मार्गदर्शक सुभाष गागरे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, पोलीस हवालदार संजय गायकवाड, मुकींदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, किशोर भणगे, निलेश निपुंगे, रावसाहेब घुमरे, अशोक कोळेकर, नगरसेवक सचिन वढागळे, पत्रकार संदीप गाडेकर, कल्याणराव कांगूणे, दत्तात्रय कोळेकर, जालिंदर बर्डे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी शिवपूजन करण्यात आले.
गडाख म्हणाले, समाजात काम करताना मानपान पाहण्यापेक्षा कामाला व सामान्य माणसाच्या हिताला महत्व देण्याची शिकरण ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिली. त्यानुसार जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. सामान्य माणसाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून प्रत्येकाने काम करणे अपेक्षित असताना आज कुठल्याही क्षेत्रात तसे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाही. समाजमन निर्मीतीत माध्यमांचे योगदान मोठे असते पण आजकाल तेथेही विश्वासार्ह्यता पहायला मिळत नाही. टीव्ही वाहिण्या कुठेतरी एका बाजूला झुकलेल्या दिसतात, अशावेळी वर्तमानपत्रांनी विश्वासार्ह्यता टिकविली. दैनिक राष्ट्र सह्याद्रीने तरुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देताना ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले, ही महत्वाची बाब आहे. आरोग्यासह शिक्षणाचे प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. बेरोजगारांसाठी नवनव्या संधी निर्माण व्हायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संपादक नवले म्हणाले, तरुणाईने शाश्वत विकासासाठी परिस्थितीची जाणीव ठेवताना व्यवस्थेचे ज्ञान घेऊन, आत्मभान जपत प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने काम केल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणे अवघड नाही. माजी सरपंच योगेश म्हस्के यांनी उमेद असणार्या तरुणांना व्यवस्थेने काम करण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा पाणीप्रश्न महत्वाचा असून पत्रकारांनी त्याला वाचा फोडावी, अशी अपेक्षा संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
प्रारंभी डॉ. कृषीराज टकले यांनी प्रास्ताविक केले. सुभाष गागरे यांनी शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास कथन केला. यावेळी कादंबरीकार गणेश निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. शकूर इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment