नेवासा - बसमधून प्रवास करताना गंगापूर येथील महिलेचे ५ तोळे दागिने सह २० हजार रुपये रोख रकमेची चोरी ३ जानेवारी रोजी घोडेगाव येथून बसमध्ये बसलेल्या महिलांनी चोरी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव ते नेवासाफाटा या दरम्यान घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिधूबाई लक्ष्मण खाजेकर (वय ६५) रा. लासूर, गगापूर जि. औरंगाबाद या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ३ जानेवारी रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास मी व माझा नातू विराज असे कल्याण ते औरंगाबाद एसटी बसने (एमएच १४ बीटी ३०३१) गंगापूर येथे येण्यासाठी निघालो.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान घोडेगाव येथून सदर बसमध्ये चार स्त्रिया व त्यांची लहान मुले असे माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. त्यापैकी एक माझ्या शेजारी येऊन बसली. तिच्याजवळ लहान दोन ते तीन महिन्यांचे बाळ होते. त्यापैकी एक महिला माझ्या बॅगजवळ खाली बसली. सदर स्त्रिया नेवासाफाटा आल्यानंतर बसमधून उतरून गेल्या. त्यानंतर मी औरंगाबाद हायवे रोडवर गंगापूर फाटा येथे माझी बॅग घेऊन नातू विराज याचेसह उतरले.
तेथून मी रिक्षाने माझ्या घरी गंगापूर येथे गेले. घरी गेल्यावर बॅगेतील सामान बाहेर काढत असताना बॅगेच्या आतमधील बाजूस ब्लेड मारल्यासारखे फाटलेले दिसले. मी बॅगेत ठेवलेल्या प्लॅस्टीक डब्याचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. तसेच २० हजार रुपये ठेवलेली प्लॅस्टीकची पिशवी मिळून आली नाही. डब्यामध्ये ३ तोळ्याची सोन्याची पोत, ७ ग्रॅम सोन्याची एकदाणी, ४ ग्रॅम सोन्याचे धम्मचक्र, ५ ग्रॅमची सोन्याची बदाम आकाराची अंगठी, २ ग्रॅमची रिंगची सोन्याची अंगठी तसेच २ ग्रॅम सोन्याचे खरबुजे मणी असे ५ तोळे सोन्याचे दागिने होते. हे दागिने तसेच प्लॅस्टीक पिशवीतील २० हजार रुपये हे सर्व चोरीस गेले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ कुंडारे करत आहेत.
No comments:
Post a Comment