राहुरी - कृषी विद्यापीठातील वरिष्ठ लिपीकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
( राहुरी प्रतिनिधी मनोज साळवे ) - पेंशन वेळेवर सुरू होण्यासाठी लागणारी कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून देण्यासाठी राहुरी येथील कृषी विद्यापीठातील वरिष्ठ लिपीकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. सदर घटना २१ ऑक्टोबर रोजी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, या घटनेतील तक्रारदार हे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रहिवाशी आहेत. ते राहुरी येथील कृषी विद्यापीठात नोकरीला असून येत्या काही महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती संदर्भातील कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून तक्रारदार यांची पेन्शन वेळेत मिळावी. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला आरोपी रामेश्वर काशिनाथ बाचकर याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागीतली. त्यामुळे तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, अहमदनगर येथील पोलिस उप अधिक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपक करांडे, पोलिस निरीक्षक शाम पवरे तसेच इतर काही कर्मचाऱ्यांच्या पथकाने कृषी विद्यापीठ परिसरात सापळा लावला.
यावेळी तक्रारदार यांच्याकडून रामेश्वर काशिनाथ बाचकर या वरिष्ठ लिपिकाने पाच हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घालून बाचकर याला रंगेहाथ पकडले.
No comments:
Post a Comment