खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 5, 2020

खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा


बीड प्रतिनिधी: एचआयव्हीग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. बीडमध्ये मात्र अशा 3 जोडप्यांना एकत्र आणून मोठ्या आनंदात त्यांचा एकाच मंडपात विवाह सोहळा पार पडला आपलं बालपण पालीमधल्या आनंदवनात घालवलेल्या तिन्ही मुलींचं कन्यादान जिल्हा प्रशासनाने केलं, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
 या विवाह सोहळ्यात सजलेला मंडप, नटून थटून बसलेले वधू-वर, खाकी आणि साध्या वेशात असलेली जिल्हा प्रशासनातील वऱ्हाडी मंडळी आणि साक्षीला असलेले सर्व आप्तेगण असा अनोखा मेळा जमला होता. हे पाहून अनेकांना या विवाह सोहळ्याचा हेवा वाटला. यामागे कारणही तसंच विशेष होतं. हा विवाह सोहळा सामान्य स्थितीतील नागरिकांचा नव्हता, तर दुर्धर अशा एचआयव्ही आजाराशी संघर्ष करणाऱ्या तीन जोडप्यांचा होता. म्हणूनच यासाठी जिल्हा प्रशासनच आयोजकाच्या भूमिकेत होतं.
 अनेकजण दुर्धर संसर्गानंतर जीवनात निराश होतात. मात्र, यांनी निराश न होता जातीच्या उतरंडी ओलांडून शेकडो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने एका नवीन जीवनास आरंभ केला. हा सगळा योग सामाजिक कार्यकर्ते संध्या आणि दत्ता बारगजे यांनी जुळून आणला. हे दोघे दाम्पत्य एचआयव्हीग्रस्त पाल्यांची सेवा करत आहेत. मागील 13 वर्षांपासून पाली येथे त्यांचं हे काम अविरत सुरु आहे. जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा वसा घेऊन संपूर्ण बारगजे कुटुंबाने या कार्यात झोकून दिले आहे. याआधी याच आनंदवनातून 3 मुली विवाहबद्ध झाल्यात, तर आज पुन्हा 3 मुलींचं विवाह बारगजे कुटुंबीयांनी लावून दिलाय. 13 वर्षांपासून सांभाळ केलेल्या मुलींचा आज सुरु झालेला संसार पाहून बारगजे कुटुंब हरखून गेलं.
दुर्धर आजाराने बाधित असलो, तरी जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या नवं दाम्पत्यात कायम दिसून आला. दरम्यान यावेळी ‘जात’ तर त्यांच्या मनालाही शिवत नव्हती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा अनोखा विवाह पार पडला. नवदाम्पत्यांना शुभेच्या म्हणून वऱ्हाडी मंडळींनीही त्यांच्या नवजीवनासाठी संसारउपयोगी साहित्य देत जगण्याची उमेद दिली. एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारातून जाताना समाजानेही दुजाभाव करु नये. तर त्यांना जगण्याची दिशा द्यावी, असं मत या मुलींचं कन्यादान करणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांनी व्यक्त केलं.
कळत न कळत झालेल्या चुकीतून बऱ्याच जणांना एचआयव्ही सारख्या जीवघेण्या संसर्गाची लागण झालीय. अनेक जण या आजारामुळे खचून जातात. जीवन जगण्याची आस सोडून देतात. अशाच निराश आणि हतबल होऊन बसलेल्या या तीन जोडप्यांच्या नव्याने रेशीमगाठी बांधल्याने त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळालीय. पुरोगामी महाराष्ट्रात अशा या विवाहसोहळ्याची परंपरा कायम रुढ व्हावी हीच अपेक्षा.

बीड(प्रतिनिधी)औसरमल गौतम सह
नन्नवरे कृष्णा

No comments:

Post a Comment