फलटण तालुक्यातील नागरिकांना अवघ्या एक रुपयात उपचार मिळणार - उमेश चव्हाण - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 13, 2020

फलटण तालुक्यातील नागरिकांना अवघ्या एक रुपयात उपचार मिळणार - उमेश चव्हाणपुणे प्रतिनिधी :आजच्या धक्काधकीच्या काळात प्रत्येक माणूस रोजगार आणि कुटुंब चालवण्याच्या शर्यतीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कष्टाचे काम करणाऱ्या कामगार, मजूर, शेतमजूर, गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड देताना त्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडत आहे. दुर्धर रोगावर उपचार किंवा ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. यामुळे दुर्दैवाने पैसे नाहीत म्हणून अनेकांचा मृत्यू होताना दिसतो, परंतु पैसे नाहीत म्हणून आता कोणी मरणार तर नाही, कारण फलटण मधील यशराज क्लिनिक मध्ये आता नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. अशी जाहीर घोषणा रूग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
       रूग्ण हक्क परिषदेच्या राज्यातील तिसऱ्या आणि सातारा जिल्ह्यातील पहिल्या दवाखान्याचे उदघाटन रविवारी फलटण येथे परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशराज क्लिनिकचे डॉ. श्रीराज गांधी डॉ. सौ. स्वप्नजा गांधी, रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव संध्याराणी निकाळजे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोटे, जिल्हा संघटक कमलाकर मोहिते, फलटण तालुका अध्यक्ष नाथा रणदिवे, ज्येष्ठ पत्रकार अर्जुन आढाव यावेळी प्रमुख उपस्थित होते.
       यावेळी बोलताना पुढे उमेश चव्हाण म्हणाले की, अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेली रुग्ण हक्क परिषद ही संघटना राज्यभर विस्तारली आहे. जनसंपर्क आणि लोकसंग्रहामुळे कोणतीही जात पात, धर्म पंथ, असा भेदाभेद न करता प्रत्येकाला जगविण्याचे काम रूग्ण हक्क परिषद करीत आहे. सर्वांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात फलटणकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी कमलाकर मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील मोटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या वैशाली जनारोग्य सुरक्षा योजनेचे "आरोग्यदूत" आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.No comments:

Post a Comment